अंगात देव येणे म्हणजे नक्की काय ?

अंगात येते म्हणजे नक्की काय होते? आपल्यापैकी प्रत्येकाने कोणाच्या ना कोणाच्या अंगात आलेले पाहिले असेलच. अचानक या प्रकाराला सुरुवात होते. शारीरिक हालचाली वेगळ्या होतात. श्वासोच्छ्वास वेगळ्या लयीत सुरू होतो आणि ब-याच वेळा नवीनच आवाजात बोलणे सुरू होते. हा प्रकार सुमारे 5 ते 10 मिनिटे टिकतो आणि मग ती व्यक्ती शांत, निपचित पडते. या काळात तिच्या अंगात प्रचंड ऊर्जा येते. ती घुमते, ओरडते, पळापळ करते, उड्या मारते व असे काहीही चित्र-विचित्र प्रकार करू शकते.


विशिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींच्या अंगात येते…
अशा अंगात येणा-या व्यक्तींच्या मानसिक रोगाचा तज्ज्ञांनी अभ्यास केला आहे. हा मानसिक आजार आहे, याविषयी आता शंका उरलेली नाही. सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तींच्या अंगात येते, ते मानसिकदृष्ट्या काही विशिष्ट गुणधर्म असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे असतात. हिस्टेरिकल व्यक्तिमत्त्व किंवा ज्या व्यक्ती सहजगत्या बाहेरच्या परिस्थितीतून सूचना स्वीकारतात (सजेस्टिबल), अशा व्यक्तींच्या अंगात येण्याची शक्यता जास्त असते.


दुर्लक्षितांच्या येते अंगात…
अंगात येणे हा प्रकार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो; पण पुरुषांच्याही अंगात येते. अंगात येणा-या स्त्रियांचा सामाजिक अभ्यास केला असता असे आढळले आहे की, या स्त्रिया कुटुंब वा समाजाकडून दुर्लक्षिलेल्या असतात. म्हणजे, ज्या स्त्रियांना मूलबाळ नाही किंवा मुलगा नाही, फक्त मुलीच आहेत किंवा घरात ज्यांचा छळ होतो किंवा ज्यांची लैंगिक उपासमार होते, अशा स्त्रियांत हे प्रकार जास्त आढळतात. तसेच जी कुटुंबे समाजापासून एकटी पडलेली आहेत, अशा कुटुंबांतील व्यक्तींमध्येसुद्धा हे प्रमाण जास्त आढळते.


वातावरणनिर्मितीचा परिणाम…
अशा व्यक्ती सजेस्टिबल असल्याने बाह्य सूचनांचा त्यांच्यावर पटकन परिणाम होतो. त्यामुळे दर्गा, मंदिरे अशा ठिकाणी आपल्यासारख्या अनेकांच्या सहवासात, धूपाच्या उग्र दर्पामुळे, आरतीच्या आवाजाने वा सततच्या घंटानादाने भारावलेले जे वातावरण निर्माण झालेले असते, त्या वातावरणात अंगात येण्याची सूचना सहज स्वीकारली जाते आणि अंगात येते. म्हणूनच अशा धार्मिक ठिकाणी आपल्याला अनेक लोकांच्या अंगात एकाच वेळी आलेले दिसते.


भावनिक कोंडमारा…
अंगात येणा-या व्यक्तींचा भावनिक कोंडमारा झालेला असतो. घरातील परिस्थितीमुळे मनातील राग, लोभ, क्रोध या भावना कुठेही व्यक्त करता येत नसतात. अशा वेळी मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण होते. अंगात आल्यावर होणा-या शारीरिक आणि मानसिक अतिरेकामुळे या भावनांचा निचरा होतो, ज्याला ‘कॅथासिसी’ म्हणतात. ती या व्यक्तींची एक प्रकारे गरजच झालेली असते. त्यातच बाहेरून या अंगात येण्याला महत्त्व दिले जाते. मान मिळतो; पुष्कळदा धान्य, पैसा, नैवेद्य दिला जातो वा प्रश्नही विचारले जातात. त्यामुळेही त्या व्यक्तीच्या मानसिक व मौलिक गरजा पूर्ण होतात आणि मग हे अंगात येण्याचे प्रकार वारंवार घडतच राहतात.
त्यातूनच पुढे मग पैसा, धान्य व इतर भौतिक गरजांच्या मोहापायी काही जणांचे अंगात येणे हे ढोंगही बनलेले असते. या प्रकारातून त्या व्यक्तीला बाहेर आणता येते. त्यासाठी नातेवाइकांचे सहकार्य मात्र मोठ्या प्रमाणावर लागते. तसेच काही औषधे नैराश्य, भ्रम कमी करायला मदत करतात. दरम्यान, अशा वागणुकीला खतपाणी घालणे बंद झाले, त्या व्यक्तीला योग्य सन्मान मिळाला वा मनमोकळेपणे बोलता येऊ लागले तर हे प्रकार बंद होण्याची खूप शक्यता असते.

Leave a comment